अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोमवार २२ जानेवारी रोजी उत्साहात साजरी झाली. या सोहळ्यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक घटना सांगितली होती. मात्र त्यावरून आता महाराष्ट्रामध्ये वादाला तोंड फुटले आहे. तसेच गोविंदगिरी महाराजांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी केल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडफोड करुन मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे व आजही केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते व राहतील आणि ते आमचे दैवत आहेत व त्यांचे स्थान अबाधितच राहील, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष धर्माच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे. भारत देशाला महान परंपरा आहे ती तोडण्याचे काम भाजपा करत आहेत. भगवान श्रीरामांना सर्व लोक मानतात, प्रभू राम हे सर्वांचे आहेत पण भाजपा व पंतप्रधन नरेंद्र मोदी हे भगवान रामाचा वापर निवडणुकीसाठी करत आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला पण त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय भाषणबाजी केली. अयोध्येतील बांधकाम पूर्ण न झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शंकराचार्यांचा विरोध होता पण त्यांच्याकडेही भाजपा व मोदींनी दुर्लक्ष केले. गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराचाही जिर्णोध्दार करण्यात आला पण त्याचा कोणी राजकीय फायदा उठवला नाही, असा टोला त्यांनी लगावला.