जमिनीसाठी ७७ वर्षीय आदिवासी महिलेचे मुख्यमंत्र्यांना साकडे!
By admin | Published: March 6, 2017 05:51 AM2017-03-06T05:51:03+5:302017-03-06T05:51:03+5:30
लक्ष्मीबाई म्हसकर या ७७ वर्षीय आदिवासी महिलेने, हक्काच्या जमिनीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
मुंबई : ठाण्यातील म्हसकर पाड्यातील लक्ष्मीबाई म्हसकर या ७७ वर्षीय आदिवासी महिलेने, हक्काच्या जमिनीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. संबंधित जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांकडून धमक्या येत असून, भूमिपुत्रांनी जगायचे कसे? असा सवाल लक्ष्मीबार्इंनी उपस्थित केला आहे.
लक्ष्मीबार्इंनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील काशी येथे असलेल्या म्हसकर पाड्यात पिढ्यान्पिढ्या १० एकराहून अधिक जमीन कसत आहे. सासऱ्यांनी कसायला घेतलेल्या या जमिनीची सर्व कागदपत्रे आपल्याकडे असून काही भूमाफियांनी आमिष दाखवून जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही, म्हणून या प्रकरणी खोटी कागदपत्रे तयार करून प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या. मात्र, तिथेही अपयश आल्यानंतर पुन्हा गुंडांकडून धमक्या देऊन जबरदस्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप लक्ष्मीबार्इंनी केला आहे. आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना खरेदी किंवा विकता येत नाहीत. असे असतानाही संबंधित भूमाफियांकडून परप्रांतीयांना जमीन विकण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचा धक्कादायक आरोपही लक्ष्मीबार्इंनी केला आहे. (प्रतिनिधी)
>पोलिसांकडून दखल नाही
जमीन हडपण्यासाठी जातिवाचक शिव्याही दिल्या जातात या प्रकरणी काशिमीरा पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे प्रकरण दिवाणी असल्याचे कारण देत, पोलिसांनी कोणतीही मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप लक्ष्मीबार्इंनी केला आहे. परिणामी, जिवाला धोका निर्माण झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.