आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:56 AM2019-08-31T11:56:39+5:302019-08-31T12:02:46+5:30
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेमधून निवडणुक लढवतील अशी चर्चा रंगलेली आहे.
नांदेड: गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेमधून निवडणुक लढवतील अशी चर्चा रंगलेली आहे. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या वरळीमधील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतूनच निवडणुक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतून जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहील तोच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी या मेळाव्यात केले होते. त्यामुळे अनिल परबांनी केलेल्या या विधानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता अनिल परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन आमने सामने येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या जनआर्शीवाद यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केल्यास शिवसैनिक या भागात दिवसाची रात्र करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील,असा शब्दही उद्धव यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.