मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:59 AM2017-12-01T05:59:09+5:302017-12-01T05:59:53+5:30
परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे.
मुंबई : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नाही तर ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असे प्रतिउत्तर मनसेने दिले आहे.
घाटकोपर येथे बुधवारी शिक्षणमहर्षी आय.डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी उत्तर भारतीय आणि इतर राज्यांतून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केले. भाषा हे संपर्काचे साधन आहे, विवादाचे नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला होता.
मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केल्याने मनसेने आता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. लांगूलचालनाच्या या राजकारणात मुंबईच्या हिताचा विचार होत नसल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. शिवाय, फडणवीस यांनी भाषेच्या अभिमानासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा, कोणत्याही भाषेचा नाही, असा टोलाही लगावला.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आधीच मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. मनसेला जशास तसे उत्तर देत काँग्रेसने उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळे आता भाजपानेही परप्रांतीयांना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे. भाजपाच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी अलीकडे उत्तर भारतीय हे मुंबईची शान असल्याचे वक्तव्य केले होते. आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य प्रांतातून येणाºयांमुळे मुंबई महान बनल्याचे सांगितल्याने मनसेला आयती संधी मिळाली आहे.
मुंबईची नाडी महाराष्ट्रात
परप्रांतीयांमुळे मुंबई महान बनत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढण्यासाठी मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानांचा आधार घेतला आहे. ‘मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती.
मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठादेखील महाराष्ट्र करतो.
महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदडो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही, अशा शब्दांत बाबासाहेबांनी राज्य पुनर्रचनेची मीमांसा केली होती. मनसेकडून सोशल मीडियात अशाच विचारांचे फोटो आणि वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.