ठाणे : पावसाअभावी मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. या वर्षी तब्बल बाराशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, परंतु याचे राज्य सरकारला कोणतेच गांभीर्य नाही. उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये केवळ आठ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून, हे पाणी पिण्यास अयोग्य आहे, त्यातच गेल्या पाच महिन्यांची टँकरची बिले या सरकारने थकवली आहेत, शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना अजून एक रुपयाही दिला नाही. मात्र, शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्ज काढून त्यांना मदत देण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडेच असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.चंदनवाडीत रविवारी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणेंनी ही टीका केली. अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली आहे. या सर्व घडामोडींचा फायदा कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. हिंदू सणांच्या बाबतीत जनतेची बाजू मांडण्यासाठी हे सरकार कमीच पडल्याने सणांवर निर्बंध आले आहेत. पण असे निर्बंध लादण्यात येऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.राज्याचे मंत्री हे मुळात मंत्र्यांसारखे वागतच नाहीत. त्यांना कोणत्याही विषयाचा अभ्यास नाही. ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री एकनाथ शिंदे यांना रस्ते विकास कामातला मुळात गंधच नाही, या विभागाला कर्ज मिळणेही अवघड आहे. अशा परिस्थितीत ‘टोलमुक्त’ करण्याच्या घोषणा ते करतात. राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असताना रस्ते टोलमुक्त करायचे झाले तर कंत्राटदारांना व्याजासहीत पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत रस्ते टोलमुक्त करण्याच्या हवेत घोषणा करायची ही शिवसेनेची पद्धत झाली आहे, असेही राणेंनी शेवटी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री थापाडेच - नारायण राणे
By admin | Published: August 31, 2015 1:43 AM