मुंबई - राज्या कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, मराठा आरक्षणाला मिळालेली तात्पुरती स्थगिती आणि कंगना व शिवसेना यांच्यात पेटलेला वाद यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.राज्यासमोर कोरोनाचे आव्हानकोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या राज्यासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. राज्यात राज्यात काल दिवसभरात २२ हजार ८४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ३९१ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३७ हजार ७६५ झाली असून, मृतांचा आकडा २९ हजार ११५ एवढा आहे. राज्यात सध्या तब्बल २ लाख ७९ हजार ७६८ सक्रिय रुणांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री आपल्या संबोधनामधून राज्यातील जनतेला कोणते आवाहन करतात आणि प्रशासनाला कोणत्या सूचना करतात, हे पाहावे लागेल.मराठा आरक्षणावर काय मांडणार भूमिकाराज्यातील मराठा समाजाला दिलेले शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीमुळे अडचणीत आले आहे. तसेच त्याविरोधात मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता आरक्षणाच्या मार्गात आलेला हा अडथळा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री कोणती भूमिका मांडतात याकडे मराठा समाजासह राज्यातील जनतेचे लक्ष असेल.कंगना-शिवसेना वादावर प्रतिक्रिया देणार काआज राज्यातील जनतेला संबोधित करताना सध्या गाजत असलेल्या कंगना- शिवसेना वादावर मुख्यमंत्री भाष्य करणार की त्याला बगल देणार याची चर्चाही सुरू झाली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका आणि अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची केलेली पीओकेशी तुलना यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे समोर आणला आहे. तसेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा चालवल्याने वाद अधिकच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी