पुणे : विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांची निर्मिती करणाऱ्या बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. याच कारणावरून यापूर्वीच अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडणे पत्करले. त्यामुळे बालचित्रवाणीची स्थिती आणखी नाजूक बनली आहे.केंद्र शासनाकडून विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी बालचित्रवाणीला निधी मिळत असला, तरी या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न राज्य शासनाने सोडविणे अपेक्षित आहे. बालचित्रवाणी ही स्वायत्त संस्था असल्यामुळे काही वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत वेतन मिळत नाही. त्यामुळे कार्यक्रमांची निर्मिती करणारे तज्ज्ञ अधिकारी, निर्माते यांनी बालचित्रवाणीला रामराम ठोकला. परिणामी, सध्या केवळ ४० कर्मचाऱ्यांमार्फत बालचित्रवाणीचा कारभार चालविला जात आहे. यामुळे काही कर्मचाऱ्यांचे गृहकर्जाचे हप्ते थकले आहेत. बँकांकडून घर जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.शासनाने आता या संस्थेच्या उभारणीकडे लक्ष दिले नाही, तर आणखी काही वर्षांनी बालचित्रवाणीला टाळे ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर बालचित्रवाणीला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्याचे आणि बालचित्रवाणीच्या सक्षमीकरणाचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे आमदार योगेश टिळेकर यांनीही बालचित्रवाणीविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)
बालचित्रवाणीची स्थिती नाजूक
By admin | Published: May 12, 2015 12:58 AM