शौकत शेख,डहाणू- डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची, आरची मिरची आणी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. येथून दररोज २०० टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकला आणि गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी येथे मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्याच्या हातात त्यामुळे लक्ष्मी नांदत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.डहाणूच्या बंदर पट्टीच्या चिंचणी, तणाशी, बावडा, कोटीम, केतखाडी, डेहणे, चंद्रनगर, आसनगाव, चंडीगाव, साखरे, वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे आदी भागातील शेतकरी काही वर्षापूर्वी फक्त गवताचे उत्पादन घेत होते. नंतर ते आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे येथील प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले होते. त्यात आता मिरचीची भर पडली आहे.पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गवताळ जमीनीवर पडवळ, दुधी, तोंडली, कारली, टोमँटो, भेंडी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. मात्र यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यानी मिरची उत्पादनाचा पर्याय निवडला. या संकरीत बियाणांच्या उत्पादनाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचा फारसा धोका नाही. एखादा रोग पडल्यास त्याचा इलाज करता येतो. तर ठिबक सिंचनाचा वापर करूनही जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणता येते. त्यामुळे शेतकरी मिरचीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तर मिरची खुडणे,भरणे इत्यादी कामांतून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे.याबाबत वाढवण येथील प्रभाकर पाटील या शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या २२ एकर वाडीमध्ये आम्ही फक्त भात हेच पीक घेत होतो. परंतु मी भोपळी मिरचीची लागवड केली असून दररोज एक टन सिमलाचे उत्पादन घेत आहे. >सिमलाही जोरातभोपळी मिरची दररोज वापी तसेच मुंबईला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरीवर्ग तरी भाजीपाला उत्पादनाकडे वळल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने हजारो मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र वाढवण बंदर या भागात झाले तर येथील बागायती नष्ट होणार असल्याने बागायतदारांचा वाढवण बंदराला ठाम विरोध आहे.
मिरचीने बळीराजा झाला समृद्ध
By admin | Published: April 04, 2017 4:02 AM