कुडाळ : सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर आज दुपारी पहिल्यांदाच विमान उतरविण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी हे विमान उतरविण्याची बेकायदा चाचणी घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच केसरकर यांनी स्वत:चे पैसे देऊन हे विमान आणल्याचा आरोप केला.
गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आज त्यानुसार 12 आसनी विमान बाप्पांसोबत उतरविण्यात आले. हे विमान चेन्नईहून आले होते. मात्र, यावरून सिंधुदुर्गात राजकीय वाद सुरु झाले आहेत. राणे यांच्या टीकेवर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले असून राणेंच्या पोटात का दुखते, असा प्रतिप्रश्न केला आहे. तसेच विमान कंपनीला दिलेले 10 लाख रुपयांचा चेक कोणाच्या खात्यातून गेला ते राणे यांनी कंपनीलाच विचारावे, असे आव्हानही केसरकर यांनी दिले.
चिपी विमानतळावर पहिले विमान उतरले...
हे विमान खासगी कंपनीचे असून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पैसे देऊन आणल्याचा आरोप केला. तसेच आज उतरविण्यात आलेल्या विमानाची चाचणी बेकायदा होती असाही आरोप राणे यांनी केला.
तत्पुर्वी राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी काल हे विमान खासगी असल्याचा दावा केला होता. तसेच केसरकर यांनी या विमानातून येऊन दाखवावे असे आव्हानही दिले होते.