Chitra Wagh : "आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 04:52 PM2021-11-06T16:52:40+5:302021-11-06T16:56:28+5:30

Chitra Wagh : आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Chitra Wagh attacks state government over fire accident fire in covid ward of civil hospital in ahemadnagar | Chitra Wagh : "आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Chitra Wagh : "आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Next

मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 रूग्णांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कामाचेच ॲाडिट करून हकालपट्टी करा, अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.   

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, "भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. आज नगरच्या सिव्हिल हॅास्पिटलच्या आगीत 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ॲाडिट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. आयसीयूमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते, असे सांगण्यात येते. 

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. आरोग्य मंत्री म्हणाले, अहमदनगर येथे झालेल्या अग्नितांडवातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगीची घटना मनाला व्यथित करणारी असल्याचे म्हटले आहे. तसेच, या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: Chitra Wagh attacks state government over fire accident fire in covid ward of civil hospital in ahemadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.