‘जय’ प्रकरणाची सीआयडी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 04:51 AM2016-08-27T04:51:32+5:302016-08-27T04:51:32+5:30
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाची शिकार झाल्याचा दावा भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाची शिकार झाल्याचा दावा भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार तपास यंत्रणा खा. पटोले यांच्याकडे ‘जय’च्या शिकारीशी संबंधित असलेली माहिती जाणून घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जयचा कुठेच थांगपत्ता लागला नसल्याने तो जिवंत नसून मारला गेला असल्याचे विधान खा. पटोले यांनी केले होते. हे विधान अतिशय गंभीर असल्याने हा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा व सीबीआयने पटोले यांच्याकडून पुरावे प्राप्त करून या प्रकरणाचा तपास करावा, अशी विनंती मुगंटीवार यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. शिवाय राज्य पातळीवर या प्रकरणाची सीआयडीमार्फतही चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना बुधवारी देण्यात आले. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)