सभापतीच्या दादागिरीविरोधात काम बंद
By Admin | Published: April 4, 2017 04:03 AM2017-04-04T04:03:58+5:302017-04-04T04:03:58+5:30
मासिक सभेच्या इतिवृत्तात बेकायदा फेरफार केल्याने पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींमध्ये जोरदार वादंग झाला.
वसई: मासिक सभेच्या इतिवृत्तात बेकायदा फेरफार केल्याने पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींमध्ये जोरदार वादंग झाला. त्यावेळी पिठासीन अधिकारी असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतापलेल्या सभापतींनी सभेत दादागिरी करुन दहा मिनिटे गोंधळ घातला. अधिकारी, कर्मचारी, सदस्यांना दमबाजीही केली. त्यामुळे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याने सोमवारी गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच काळ््या फिती लावून निदर्शने केली.
वसई पंचायत समितीच्या शनिवारच्या मासिक सभेत मोठा गदारोळ झाला. सभापती चेतना मेहेर यांनी सर्व संकेत पायदळी तुडवून कोरम पूर्ण झाला नसतानाही सभा सुुरु केली. इतकेच नाही तर इतिवृत्तात स्वत:च्या हस्ताक्षरात फेरबदल करून मंजुरी मिळण्याचा प्रयत्न केला. यासर्व गोष्टींना उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी आक्षेप घेतला. त्यावरून मेहेर आणि ठाकूर यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी पिठासीन अधिकारी असलेल्या गटविकास अधिकारी शीतल पुंड यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभापती चेतना मेहेर यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी सभागृहात असलेल्या सर्वांनाच दमबाजी सुरु केली. बांगड्या मागे सारुन मुठी टेबलावर आपटत माझ्यात दम आहे, मीच बैठक घेणार असे ठणकावून सांगितले. यावेळी पुंड, ठाकूर यांच्यासह काही अधिकारी समजावत असतांनाही मेहेर यांनी सर्वांनाच दमबाजी करीत रोखून धरले. त्यामुळे पुंड यांनी पीठासन अधिकारी म्हणून आपले ऐकले जाणार नसेल तर मी सभात्याग करते, असे सांगून सभागृह सोडले. त्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही सभात्याग केला. मेहेर यांचा गोंधळ सुरु राहिल्याने उपसभापती ठाकूर यांच्यासह सर्वच सदस्यांनी सभात्याग केला.
दरम्यान, वसई पंचायत समितीत बहुजन विकास आघाडीचे सहा आणि श्रमजीवी संघटनेचे दोन मिळून आठ सदस्य आहेत. सभापती बहुजन विकास आघाडीच्या असताना त्यांनी सभागृहात उपसभापतींचाही अवमान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कालपासून काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे गटविकास अधिकारी शितल पुंड यांनी सोमवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह काम बंद आंदोलन केले. तसेच कार्यालयासमोर काळया फिती लावून निदर्शने केली. सभापतींनी बेकायदा सभा सुरु केली. त्यानंतर इतिवृत्तात बेकायदेशीर फेरफार केले. पिठासीन अधिकारी म्हणून मला बोलू दिले नाही. चुकीची गोष्ट होऊ नये म्हणून मी हस्तक्षेप केला असता कामकाज करण्यापासून मला रोखले. टेबलावर मुठी आपटत दहा-पंधरा मिनिटे गोंधळ घातला. आता काही जणांना फोनवर धमकावले जात आहे. आम्ही पण माणसे आहोत. आम्हाला गुलाम म्हणून वागवू नका. इतकेच आमचे म्हणणे आहे. याप्रकरणी वरिष्ठांना सविस्तर अहवाल पाठवणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
सभापतींनी सर्व प्रथा परंपरा मोडून बेकायदेशीरपणे सभा सुरु केली. प्रशासनाला सादर केलेल्या इतिवृत्तात बेकायदेशीर बदल केले. सभागृहात जे घडले नाही ते इतिवृत्तात लिहीले. म्हणून मी हस्तक्षेप केला. पण, सभापती कुणाचेही म्हणणे ऐकून न घेत नव्हत्या. अर्वाच्य भाषा आणि दादागिरी करीत सभापतींनी सभागृहाचा अवमान केला आहे, असेही पुंड म्हणाल्या. (प्रतिनिधी)