नागपूर : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे. मात्र, त्यापूर्वी रविवार, ४ डिसेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा प्रवास सोबत करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेणार आहेत.
नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईदाभा या टोल नाक्याजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या स्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून रस्त्यांचे झालेले एकूण काम व कार्यक्रमाची तयारी याचा आढावा घेतला. रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी साडेआठ वाजता विमानाने नागपूरला आगमन होईल. त्यानंतर खा. कृपाल तुमाने यांच्या घरी सदिच्छा भेट देतील. तेथून सकाळी १०.१५ वाजता ते समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉइंटवर पोहोचतील. येथून ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाने प्रवास करणार आहेत.
समृद्धी महामार्गाच्या रूपात एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर साकारला जात आहे. हा महामार्ग विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रासाठी समृद्धी घेऊन येईल. पंतप्रधान येण्यापूर्वी या रस्त्याची पाहणी करणे आवश्यक आहे. म्हणून आज पाहणीसाठी आलो आहोत - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"