कोकणी भाषेच्या विकासासाठी गोवा सरकार नेहमीच कटिबद्ध; प्रमोद सावंत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 09:53 AM2022-05-15T09:53:59+5:302022-05-15T09:54:47+5:30
कोकणी अधिवेशनात युवकांची संख्या कमी दिसत आहे. कोकणीतून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच कोकणी बालकांमध्ये रुजू शकेल, असे प्रतिपादन प्रमोद सावंत यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : कोकणी अधिवेशनात युवकांची संख्या कमी दिसत आहे. कोकणीतून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच कोकणी बालकांमध्ये रुजू शकेल. कोकणी अस्मितेची पिढी त्यातूनच निर्माण होईल. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीयत्व हे विषय साहित्यिकांनी मांडायला हवेत. गोवा हे कोकणी राज्य आहे. कोकणी भाषेच्या विकासासाठी सरकार नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
मालवण धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी गोव्याचे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, आमदार वैभव नाईक, परिषदेच्या अध्यक्ष उषा राणे, रुजारिओ पिंटो, परिषदेचे नूतन अध्यक्ष अरुण उभयकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.