मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर(Milind Narvekar) यांची वर्णी लागली आहे. या नियुक्तीसाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शिफारस केली होती. त्यानंतर बुधवारी आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर करणारं परिपत्रक काढलं. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या देवस्थानच्या ट्रस्ट सदस्यपदासाठी देशभरातून २४ सदस्यांची निवड केली जाते. त्यासाठी पदासाठी अनेक चढाओढ लागलेली असते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन सदस्यपदासाठी नावं सुचवतात. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी( YS Jaganmohan Reddy) यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. (Milind Narvekar Appointed as Tirumala Tirupati Devasthanams Trust Board Member)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार
मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. एका सामान्य कुटुंबात जन्माला जन्मलेले मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होण्यासाठी धडपडत होते. मुलाखत देण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पहिल्याच भेटीत वाकचातुर्य पाहून उद्धव ठाकरेही प्रभावित झाले. नार्वेकरांचं एकंदरीत अनुभव आणि कौशल्य पाहता उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी सोपवायची याबाबत त्यांना विचारणा केली.
मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या उत्तरानं उद्धव ठाकरेही खूश झाले, तेव्हापासूनच ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. साधारण १९९४ साली मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले. त्यानंतर आजतागायत उद्धव ठाकरे यांची सावली बनून मिलिंद नार्वेकर त्यांच्यासोबत कायम असतात. मिलिंद नार्वेकर सध्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग गर्व्हिनिंग कौन्सिलचे अध्यक्षही आहेत. मात्र आता मिलिंद नार्वेकरांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नेमणूक करुन देशपातळीवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.