मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ ऑगस्टपासून राज्यव्यापी महाजनादेश यात्रेवर निघणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथून मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. याशिवाय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण आॅगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.
राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यात महाजनादेश यात्रा पोहोचेल. पहिल्या टप्प्यात १ ते ९ ऑगस्ट दरम्यान मोझरी ते नंदूरबार; दुसºया टप्प्यात १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद ते नाशिक अशी यात्रा निघणार आहे. २५ दिवसांच्या या यात्रेत ४,२४३ किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. १०४ प्रचार सभा, २२८ स्वागत सभा, २० पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ही यात्रा राज्यातील १५२ विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचणार आहे.
महाराष्ट्रातील जनता जनार्दनाचे दर्शन या यात्रेत घेणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विकास आणि विश्वासाची ही यात्रा असणार आहे. यात्रा सुरू असताना सरकारचे काम मात्र थांबणार नाही. इलेक्शन मोडवर असलो, तरी राज्यातील दुष्काळी स्थितीचे भान असल्याने सरकारचे काम थांबणार नाही. सरकारही चालेल आणि यात्राही. जनादेश यात्रेत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच किती सामान्य नागरिक सहभागी होतात, हे पाहिले जाईल, असे सूचक विधानही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
गडकरी, पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीची चर्चाभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा बैठकीच्या सकाळच्या सत्रात सुरू झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यातील ही अखेरची बैठक आहे. यामुळे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित असतानाही काही नेते गैरहजर असल्याने नाराजीबाबत कुजबुज सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याबाबत खुलासा करावा लागला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसरा कार्यक्रम असल्याने पूर्वकल्पना देऊन अनुपस्थित राहिले. त्यांच्या कार्यालयाकडून तशी माहिती देण्यात आली, तर सुधीर मुनगंटीवार हे प्रकृती अस्वास्थामुळे पहिल्या सत्रास येऊ शकले नाहीत. मात्र, दुसºया सत्रास ते उपस्थित होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही मांडला, तर पंकजा मुंडे या आपल्या मुलाच्या अॅडमिशनसाठी अमेरिकेत आहेत. त्याबाबत त्यांनी कळविले होते. याबाबत, चंद्रकांत पाटील म्हणाले की, गडकरीजी, सुधीरभाऊ, पंकजाताई अनुपस्थित असल्याची बातमी सुरू आहे. सुधीरभाऊंची तब्येत ठीक नसल्याने ते उशिरा आले आहेत. इतरांनी अनुपस्थितीबाबत पूर्व कल्पना दिली होती. आता सुधीरभाऊ राजकीय प्रस्ताव मांडायला दुसºया सत्रात आले आहेत, असे पाटील म्हणाले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून जोरदार कार्यक्रमांची आखणी सुरू आहे. भाजपने कार्यक्रमांच्या माध्यमातून
आखलेला निवडणुकीचा रोडमॅप पुढीलप्रमाणे२५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९ - जिल्हाश: शक्ती केंद्र प्रमुख बैठक,९ ऑगस्ट २०१९ - सदस्यता अभियान मोहीम ;१ जुलै ते १५ ऑगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान, युवा मोर्चा ;१५ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ - विस्तारक योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत);१० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०१९ - विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन;१ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०१९ - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन);१६ ऑगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम;१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट - महाजनादेश यात्रा;१५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम;१६ ऑगस्ट - स्व. अटलजी स्मृतिदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण);तसेच गणेशोत्सवात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट; तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा - गणेशोत्सव मंडळ तसेच घरगुती गणपतीसाठी.