गारठ्याने तिघांचा बळी, विदर्भात येणार थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:26 AM2017-12-28T04:26:55+5:302017-12-28T04:27:06+5:30
पुणे : नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होत असतानाच राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.
पुणे : नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होत असतानाच राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गारठ्याने बुधवारी लातूर जिल्ह्यात शेतमजुराचा तर कोल्हापूरात दोघा फिरस्त्यांचा मृत्यू झाला. विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर येथे ७़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़
मराठवाडा, विदर्भातील किमान तापमान सातत्याने घटत असून लातूर जिल्ह्यात थंडीने शेतमजूराचा बळी गेला. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर पंजाब, उत्तर राजस्थान, कच्छ, मश्चिम मध्य प्रदेश या भागात थंडीची लाट असून त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यावर झाला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) - पुणे १०़८, जळगाव ९, कोल्हापूर १६़१, महाबळेश्वर १२, मालेगाव १०़५, नाशिक ८़२, सांगली १४़१, सातारा १२़३, मुंबई २१़२, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १८़४, रत्नागिरी २०़३, पणजी १९़५़ डहाणू १६़८, भिरा १९़५, उस्मानाबाद ८़६, औरंगाबाद १०़१.
तिघांचा बळी - लातूर जिल्ह्यात दयानंद यादव भालेराव (४३, रा. डोंगरगाव, ता. निलंगा) या शेतमजुराचा थंडीने गारठून मृत्यू झाला. औराद शहाजानी व तेरणा काठावरील परिसरात थंडीचा कडाका वाढला असून पारा ८ अंशांपर्यंत खाली आला आहे. कोल्हापूरात एक महिलेसह दोघा फिरस्त्यांचा थंडीने बळी घेतला. दस्तगीर नियाम नदाफ (वय ५० रा. रजपूतवाडी) असे एकाचे नाव असून महिलेची ओळख पटलेली नाही.