मुंबई - कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल हे या हिंसाचाराच चौकशी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. जे. एन. पटेल यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले होते. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला होता. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्या आहेत.वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले होते. कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद 3 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व बसचे चालक गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शीघ्रकृती दलाच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराची होणार चौकशी, माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 10:42 PM