मुंबई : हरित सेनेचे सदस्य होऊन वृक्ष लागवड कार्यक्रमात राज्यातील कंपन्या आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे व कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले.राज्यात येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यातील कॉपोर्रेट हाउसेसच्या सहभागाबाबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस महिंद्रा अँड महिंद्रा. सीआयआय, पाल फॅशन्स, कामत हॉटेल इं. लि, जे. पी. मॉर्गन, ग्रीन मास्टर औरंगाबाद, गोदरेज लि., स्वदेश फाउंडेशन, रिलायन्स, डब्ल्यू. सी. एल. नागपूर, इंडियन आॅइल आणि टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींचा समावेश होता.राज्यातील इंडस्ट्री ‘ग्रीन इंडस्ट्री’ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून वनमंत्री म्हणाले की, राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात जागा मोकळी आहे. येथे वृक्षलागवड करून मोकळ्या जागेच्या ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा निकष कंपन्या पूर्णत्वाला नेऊ शकतात. वृक्षलागवडीत कंपन्यांच्या मालकांनी स्वत:सह कामगारांना सहभागी करून घ्यावे, त्यांना हरित सेनेचे सदस्य करावे, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.राज्यात ४८ लाखांहून अधिक व्यक्ती आणि संस्थांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. आपल्याला जगात सर्वात मोठी एक कोटी व्यक्तींची हरित सेना उभी करावयाची आहे. शहरांमध्ये ‘गच्ची वन’ सारखी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत हिरवाई निर्माण करावाची आहे. मागील तीन वर्षात सर्वांच्या सहकार्याने या कामाला गती मिळाली आहे. कंपन्यांना त्रिपक्षीय करार करून वृक्ष लागवडीसाठी सात वर्षांकरिता जमीन उपलब्ध करून दिली जाते, त्याचाही विचार कंपन्यांनी करावा, असेही ते म्हणाले. बैठकीत हरित सेनेचे तसेच राज्यातील महावृक्षलागवड मोहिमेची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.
कार्बन फूटप्रिंट कमी करण्यामध्ये कंपन्यांनी योगदान द्यावे - मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:52 AM