‘नीट’मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By admin | Published: May 17, 2016 02:38 AM2016-05-17T02:38:30+5:302016-05-17T02:38:30+5:30
‘सीईटी’ऐवजी ‘नीट’ परीक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत
खडकी : ‘सीईटी’ऐवजी ‘नीट’ परीक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नीट परीक्षेसंदर्भातील माहिती आणि मार्गदर्शन कोठेच मिळत नसल्याने राज्य शासनाने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याची मागणी वंदे मातरम् संघटनेने केली आहे.
सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित नीट परीक्षा २४ जुलैला घेण्यात येणार आहे. केवळ दोन महिन्यांत राज्याचे विद्यार्थी बदललेल्या अभ्यासक्रमास कसे सामोरे जाणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. याचा फायदा घेत खासगी शिकवणी वर्गांनी दोन महिन्यांच्या विशेष वर्गासाठी भरमसाट शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यावर सरकारचा कोणताच अंकुश नाही. ऐपत असणारे खासगी वर्ग लावत आहेत. मात्र, सामान्य व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
सीबीएसई अभ्यासक्रमाचा राज्याचे विद्यार्थी धसका घेतात. तो अभ्यासक्रम दोन महिन्यांत पूर्ण करून घेण्याचे आश्वासन जाहिरातबाजी करून खासगी शिकवणीवर्गाकडून देण्यात येत आहे. यासाठी भरमसाट शुल्क आकारले जात आहे. त्यावर मर्यादा घालावी. पुढील काळात प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षा सीबीएसई पॅटर्नवर घेतल्या जाणार असल्याने एसएससी व एचएससी बोर्डाचा उपयोग केवळ मर्यादित शाखेच्या नोकरीसाठी राहणार आहे. उच्च शिक्षणापासून राज्याचे विद्यार्थी वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे आठवीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश करून बारावीपर्यंत देशभरात समान अभ्यासक्रम राबवावा. खासगी वर्गाकडे कल वाढल्याने कनिष्ठ महाविद्यालय रिकामे असतात.
ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी संघटनेचे प्रांताध्यक्ष विकास हांडे, कार्याध्यक्ष राजेश शर्मा, सचिव राजेंद्र
जगताप, शिरीष रोच यांनी केली
आहे. (वार्ताहर)