मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सभागृहातील दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. मात्र, त्यात चिमटे, कोट्या होत्या आणि त्यातून हशाही पिकला.
पुढेही आमचीच सत्ता येणार तेव्हा पुन्हा एकदा तुम्हीच विरोधी पक्षनेते व्हावेत ही माझी शुभेच्छा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वडेट्टीवार मुळात शिवसैनिक आहेत आणि ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनुसार करतात. लढाऊ कार्यकर्ता, नेता म्हणून मला त्यांच्याविषयी नेहमीच आपुलकी आहे असेही शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांचा उल्लेख माईकची गरज नसलेला विदर्भाचा बुलंद आवाज, असा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा ते लौकिक वाढवतील असा विश्वास व्यक्त केला.
खुर्चीची पूजा करा -राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी, विरोधी पक्षनेते नंतर सत्तापक्षात जातात असा चिमटा काढला. या पदाच्या खुर्चीची पूजा केली पाहिजे असे ते हसत म्हणाले. मात्र, वडेट्टीवार निष्ठावान नेते असून ते पदाला नक्कीच न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, शिवसेनेचे भास्कर जाधव, भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन केले.