मुंबई: काल भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना सरकार आणण्यासाठीअडीच वर्षे प्लॅनिंग करत होतो, असं वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनीही भाजपवर टीका केली आहे. "दुसऱ्याची घरे फोडणे हा भाजपचा धंदा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. "भारतीय जनता पार्टीने शिवसेना तोडण्याची योजना केली होती. त्यात ते यशस्वी झाले आहेत. दुसऱ्याची घर तोडणे हा भाजपचा धंदा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर
दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. या दाव्याला आज शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.
आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. हा आमचा उत्स्फुर्त उठाव होता. आमचा हा उठाव काही तत्वांसाठी होता. आमचं या संदर्भात अगोदर कोणतही प्लॅनिंग नव्हते, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल काल पुण्यात पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेतील काही किस्से सांगितले.