देशात अजूनही काही लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 1, 2021 02:15 PM2021-01-01T14:15:05+5:302021-01-01T14:29:38+5:30
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापणार
पुणे : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. कारण आधीपासून औरंगाबाद चे संभाजीनगर करण्याबाबत कायम आग्रही भूमिका असणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसने या नामांतरासाठी दर्शविलेला विरोध यावरून महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून एकमत नसल्याचे समोर येत आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून भाजपाने देखील काँग्रेस व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेना, काँग्रेस यांच्यावर कडाडून टीका केली. पाटील म्हणाले, औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का असा संतप्त सवाल उपस्थित करत संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध आहे का? हाही प्रश्न विचारला. आणि असेलच विरोध तर मग औरंगजेबाचं नाव तरी कशाला असायला हवे ते पहिल्यांदा हटवले गेले पाहिजे.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे ही तर बाळासाहेब ठाकरेंची भूमिका..
तुम्ही नामांतराच्या गोधड्या वाळवत आहात असे आम्हाला म्हणत होता. तर मग आता करा नामांतर. काँग्रेसचा विरोध आहे, अन् शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे यात आम्हाला पडायचं नाही. मात्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर व्हावे ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम भूमिका घेतली होती. मात्र पाच- सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर व्हावे असे म्हटले तर माझ्यावर सामनात अग्रलेख छापला होता.
औरंगाबाद शहराच्या नामांतरावर काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात..
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितंले.