"गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या"; काँग्रेसचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 03:35 PM2024-11-04T15:35:10+5:302024-11-04T15:36:07+5:30

महाराष्ट्राला देशात पुन्हा नंबर एकचे राज्य करण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प, असेही ते म्हणाले.

Congress slams BJP and appeals voters to vote for political party that works for Maharashtra not Gujarat Maharashtra Assembly Election 2024 | "गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या"; काँग्रेसचा खोचक टोला

"गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या"; काँग्रेसचा खोचक टोला

Maharashtra Assembly Election 2024: "महाभ्रष्ट महायुती भाजपा सरकारच्या काळात गुजरातच्या ठेकेदारांना मोठी कामे दिली तर टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन हिरे उद्योग, बल्क ड्रग्ज पार्क सारखे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पाठवून येथील रोजगारही पळवले. महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार गुजरातला दिले आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुणपिढी बरबाद करण्याचे पाप भाजपा युती सरकारने केले आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार महाराष्ट्रासाठी नाही तर गुजरातसाठी काम करत आहे," असा खोचक टोला काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ निरीक्षक खा. सय्यद नासीर हुसेन यांनी लगावला. तसेच, महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

डॉ. नासिर हुसेन म्हणाले, "भाजपा युती सरकार हे भ्रष्ट व घोटाळेबाज सरकार आहे.  ४० टक्के कमिशनवाल्या या सरकारने घोटाळ्यांचे अनेक विक्रम केले आहेत. १० हजार कोटींचा जलयुक्त शिवार घोटाळा, ८ हजार कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा, ६ हजार कोटींचा मुंबईतील रस्ते घोटाळा असे अनेक घोटाळे या सरकारने केले आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ज्या कंपन्यांनी मोठ्या देणग्या दिल्या त्या कंपन्यांना महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांचे काम दिले आहे. भाजपा ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करून गप्प बसते, अजित पवार, रविंद्र वायकर, अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घोटाळ्याचे आरोप केले व त्यांना भाजपात घेतल्यावर आता मात्र ते यावर काहीच बोलत नाहीत, यावर भाजपाने उत्तर दिले पाहिजे."

"भारतीय जनता पक्षाने सीबीआय, ईडीचा धाक दाखवून आमदार फोडून विरोधी पक्षांची सरकारे पाडली. कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची सरकारे भाजपाने पाडली ते जनतेला आवडले नाही. कर्नाटकात जनतेने भाजपाला धडा शिकवत काँग्रेसचे बहुमताचे सरकार जनतेने आणले तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपालाही जनता धडा शिकवून काँग्रेस मविआचे सरकार आणेल," असा विश्वास डॉ. नासिर हुसेन यांनी व्यक्त केला.

"भाजपा सरकारच्या काळात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर अत्याचार वाढले आहेत, महिला अत्याचार वाढले आहेत. शेतकरी आत्महत्याही वाढल्या असून देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली नाही तसेच पीक विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. शेतीमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे महागाई प्रचंड वाढली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८०० रुपये असताना प्रत्यक्षात फक्त ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. पण दुसरीकडे गोडतेलाच्या १५ किलोंच्या डब्याचे किंमत १६०० रुपये होती ती वाढून १० दिवसांत २१५० रुपये झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असताना पेपरफुटी नित्याचीच झाली आहे.  तलाठी परीक्षा, पोलीस भरती प्रत्येक परिक्षेचे पेपर फुटत आहेत. भाजपा सरकारच्या काळात सर्वत्र अनागोंदी कारभार असून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले त्यांच्या महाराष्ट्रात द्वेष पसरविण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे.  हे चित्र बदलून महाराष्ट्राला देशात पुन्हा एकदा नंबर एकचे प्रगत राज्य बनवण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प आहे, त्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा", असेही डॉ. नासिर हुसेन म्हणाले.

Web Title: Congress slams BJP and appeals voters to vote for political party that works for Maharashtra not Gujarat Maharashtra Assembly Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.