अतुल कुलकर्णी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष असून, तो काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, तुम्ही कोणत्याही चर्चेत न अडकता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, विद्यमान आमदारांशिवाय, ९० जागी तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. त्यात महिलांचा समावेश असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
विलीनीकरणाच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. ते करणाऱ्यांची नावे व हेतू मला माहीत आहेत. अशा चर्चांत तुम्हाला अडकवण्याचे हे कारस्थान आहे. याला बळी पडू नका, आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे, असे सांगून पवार म्हणाले की, १९८० साली आपले ५६ आमदार होते, मी परदेशात गेलो तेव्हा त्यातील ५० आमदार बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी पळविले. आपल्याकडे ६ आमदार राहिले. मात्र नंतरच्या निवडणुकीत ६चे ६० झाले.
राजीव गांधी यांना ४०० जागा मिळाल्या होत्या, त्यांचाही नंतर पराभव झाला. त्यामुळे चिंता करू नका, लोकसभेची स्थिती कायम राहणार नाही. या वेळी नरेंद्र मोदींविरोधात दुसरा चेहराच नाही असे चित्र तयार केले गेले. विकासाचे मुद्दे समोर येऊ दिले नाहीत. कारण सरकारने कामेच केली नव्हती. त्यामुळे निवडणूक राष्ट्रवादावर झाली. आता ती स्थिती नाही. त्यामुळे हे सरकार पराभूत होणार नाही, असे मुळीच समजू नका, असेही पवार म्हणाले.
जून अखेरीस उमेदवार : अजित पवारविधानसभेच्या १४४ जागा राष्ट्रवादी लढवेल. काँग्रेसशी आघाडी कायम आहे. तो पक्षही तेवढ्याच जागा लढवेल. दोघांनी आपल्या मित्रपक्षांना सामावून घ्यायचे आहे. त्यामुळे जागावाटपात अडचण नाही. सर्व उमेदवारांची नावे जूनअखेरीस निश्चित केली जातील. त्यामुळे आत्ताच कामाला लागा, असे अजित पवार म्हणाले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा हक्क असून, त्यांना आम्ही त्याला विरोध करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस डिक्टेट करण्याच्या स्थितीत नाहीकाँग्रेसची स्थिती डिक्टेट करण्यासारखी नाही. राज्यातून जे एकमेव खासदार निवडून आले त्यांना आधी तिकीट नाकारले होते. मी मध्यस्थी केल्याने धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे काँग्रेसची एक जागा तरी आली. काँग्रेसने २७ जागा लढवल्या. पण एक जागा निवडून आली. आपण १७ जागा लढवल्या, त्यापैकी ४ निवडून आल्या. राहुल गांधी विधानसभेसाठी आघाडी करण्यास तयार आहेत. जागांची अदलाबदल करण्यासही त्यांची तयारी आहे.