काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर (Congress Yashomati Thakur) यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याची घटना समोर आली आहे. काम क्वालिटीचं दिसलं नाही तर अधिकाऱ्यांना त्यांनी डोकं फोडेन असा इशारा दिला आहे. ठाकरे सरकारमध्ये यशोमती ठाकूर मंत्री होत्या. तसेच त्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. ठाकूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका रस्त्याच्या कामाच्या उद्धघाटनाचा बोर्ड लागलेला दिसत आहे.
यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण या कामात पैसे घेतले का? असा सवाल केला आहे. तसेच या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास डोकं फोडण्याचा इशारा देखील दिला आहे. यावर अधिकारी वर्ग काही वेळ शांत राहतो. अमरावती जिल्ह्यातील एका ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना त्यांनी हा इशारा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे.
"केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर...सोनिया गांधींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही", असे सांगत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
केंद्रातील मोदी सरकारने जे काही चालवले आहे, कित्येक राज्यांमध्ये ईडीच्या भरोशावर ऑपरेशन लोटस सुरू केलेले आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना, त्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना चौकशीला बोलावले आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं होतं.