राज्यातही काँग्रेसचा ‘राजस्थान पॅटर्न’? नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:16 PM2021-11-25T12:16:35+5:302021-11-25T12:20:22+5:30
नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल.
मुंबई : राजस्थानमध्ये ज्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्याने मंत्रिमंडळ तयार केले, त्याच पद्धतीने काही धक्कादायक निर्णय महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने घेतले जातील. हिवाळी अधिवेशनाच्या आधी हे बदल करावेत, असा काँग्रेसने आग्रह धरल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद देण्यावरून चर्चा सुरू आहे. त्याच वेळी विधानसभेचे अध्यक्षपद भरण्यासाठीची चर्चा देखील पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.
नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल. तर काहींना मंत्रिपद, असे सांगण्यात येत आहे. पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद देतानाच मंत्रिपदही दिले जाईल, असा शब्द श्रेष्ठींनी दिला होता. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल असे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांचाही आग्रह आहे.
त्याशिवाय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यातही काही बदल केले जातील, असे सांगितले जाते. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आधीच जाहीर केले आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले होते. मात्र त्यावर पक्षाने निर्णय घेतला नव्हता.
अधिवेशन मुंबईतच
पुढच्या आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक अपेक्षित आहे, असे विधिमंडळातील अधिकाऱ्यांचे मत आहे. अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच घेण्याचा आग्रह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही धरला आहे. २० डिसेंबरच्या दरम्यान एक आठवड्याचे अधिवेशन मुंबईतच पार पडेल. त्याआधीच काँग्रेसला हे बदल करून हवे आहेत, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.