लोणावळा : पर्यटननगरी लोणावळ्यात दहशतवादी अथवा दंगलीसारख्या घटना घडल्यास कसे सामोरे जायचे, यासाठी ‘मॉक ड्रिल’ केले जाते. मात्र, वारंवार केले जाणारे मॉक ड्रिल धोकादायक ठरू शकते, असे मत व्यक्त होत आहे.लोणावळा शहरात काही दहशतवादी कारवाईसारखे प्रकार अथवा दंगलीच्या घटना घडल्यास त्यांचा सामना कसा करावा? किती वेळामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, जिल्हा प्रशासन व पोलीस मुख्यालय, तसेच इतर शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचून मदत करू शकतात? या सराव किंवा प्रात्यक्षिक करण्यासाठी मॉक ड्रिल पोलीस प्रशासनाकडून घेतली जातात. लोणावळा हे कायमच संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कायमच रेड अलर्ट असतो. याकरिता वर्दळीच्या ठिकाणी काही तरी भयंकर झाले आहे, असे दर्शवून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव निर्माण करून नतंर ते मॉक ड्रिल होते, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगितले जाते. मागील सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये शहर व परिसरात पाच वेळा मॉक ड्रिल झाली आहेत. यामुळे अशा काही घटना सुरू असल्या की, नागरिक स्वत:च ते मॉक ड्रिल आहे, असे सांगत पुढे निघून जातात.मुंबई व पुणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मध्यबिंदू अशी लोणावळ्याची ओळख आहे. देशभरात कोठेही काही विघातक घटना घडल्या की, मुंबई-पुण्यासह लोणावळ्यातही रेड अलर्ट व नाकाबंदी लावली जाते. या शहरात मॉक ड्रिलचा एखादा-दुसरा थरार ठीक आहे. मात्र, वारंवार अशी प्रात्यक्षिके घेतली जात असल्याने नागरिकांमधील सजगता व भीती कमी होऊ लागली आहे. पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त इतर यंत्रणादेखील असे कॉल आल्यावर ते मॉक ड्रिल असेल, असे समजत निवांतपणे घटनास्थळी पोहचतात.एका मॉक ड्रिलला तर रुग्णवाहिकेच्या जागी कॉल मिळाल्यानंतर तासाभराने चक्क शववाहिनी आली होती. दुर्दैवाने एखादी घटना या लोणावळा शहरात घडल्यास येथील नागरिक व संबंधित शासकीय यंत्रणा त्या घटनेकडेदेखील ‘लांडगा आला रे आला’प्रमाणे मॉक ड्रिल समजून दुर्लक्ष करू शकतात. त्यातून मोठा अनर्थ घडू शकेल. यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर) उपाययोजनांची गरज : पर्यटनस्थळे असुरक्षितपर्यटनासाठी लोणावळा शहर व परिसरात लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. असे असताना येथील पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या काहीही उपाययोजना नाहीत. पर्यटनस्थळांवर कोण येतंय, काय करतंय, याबाबत कोणालाच माहिती नसते. तसेच लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी बंगले व सेकंड होम भाड्याने दिली जातात. या ठिकाणी कोण वास्तव्य करते, याबाबत कसलीही माहिती उपलब्ध नसल्याने शहर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बनू लागले आहे. शहरातील या ठिकाणांवर पोलिसांनी गस्तीच्या माध्यमातून, तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच खासगी बंगले व सेकंड होम भाड्याने देणाऱ्यांनी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची माहिती पोलिसांना सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध करून द्यायला हवी.
सततच्या ‘मॉक ड्रिल’ने गांभीर्य कमी
By admin | Published: May 17, 2016 2:42 AM