कूपरेज बॅंडस्टॅंडवर पुन्हा ऐकू येणार धून, मुंबईकरांना अनुभवता येतील जुने दिवस
By अोंकार करंबेळकर | Published: August 19, 2017 11:11 AM2017-08-19T11:11:59+5:302017-08-19T14:36:42+5:30
ब्रिटीश अधिकाऱ्यांनाही मनोरंजनासाठी फारसे सांगितीक कार्यक्रम पाहायला मिळत नसत. त्यामुऴे शहरात विविध जागांवर बॅंडस्टॅंड तयार करण्यात आले होते. या बॅंडस्टॅडमध्ये संध्याकाळी कार्यक्रम होत असत. वेगवेगळ्या गाण्यांच्या धून ऐकण्याची संधी नागरीकांना यामुळे मिळत असे.
मुंबई, दि.19- मुंबईत रेडिओ येण्यापुर्वी मनोरंजनासाठी लोकांना नाटकं, सिनेमा यांच्यावरच विसंबून राहावं लागे. पण प्रत्येकवेळेस नाटक-सिनेमांचे खेळ पाहायची संधी मिळेलच असे नव्हते. त्यातून त्याची तिकिटेही सर्वसामान्यांना परवण्यासारखी नव्हती. ब्रिटीश अधिकाऱ्यांनाही मनोरंजनासाठी फारसे सांगितीक कार्यक्रम पाहायला मिळत नसत. त्यामुऴे शहरात विविध जागांवर बॅंडस्टॅंड तयार करण्यात आले होते. या बॅंडस्टॅडमध्ये संध्याकाळी कार्यक्रम होत असत. वेगवेगळ्या गाण्यांच्या धून ऐकण्याची संधी नागरीकांना यामुळे मिळत असे.
मुंबईतला पहिला सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉर्निमन सर्कल येथेही एक बॅंडस्टॅंड तयार करण्यात आला होता. या बॅंडस्टॅंडमध्ये गव्हर्नर बॅंड ऐकण्यासाठी येत असत, असे सांगितले जाते. याचप्रमाणे जिजामाता उद्यान, मलबार हिल येथेही बॅंडस्टॅड तयार करण्यात आले होते.
अशाच प्रकारे कुपरेज बॅंडस्टॅंडही लोकांच्या विशेष आवडीचा बॅंडस्टॅंड होता. अर्काइव्ह्जमधील नोंदीनुसार 1867 साली बांधण्यात आलेल्या या बॅंडस्टॅंडसाठी एस्प्लेड फी फंड समितीने आर्थिक हातभार लावला होता. याचाच अर्थ यंदाच्या वर्षी कुपरेज बॅंडस्टॅंडला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र गेली काही दशके याचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता बॅंडस्टॅंडच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला नवी झळाळी मिळणार आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे 'वास्तुविधान'ची कन्झर्व्हेशन आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व जतन आणि संवर्धन प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून सर्व खर्च पालिका करणार आहे. तसेच या कामासाठी जीर्णोद्धार कन्झर्वेटिव्ज प्रा. लि. या निष्णात कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.
मोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण.
नव्याने कार्यक्रमांचे आयोजन करता येईल
कुपरेज बॅंडस्टॅंडची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार वास्तुविधान संस्थेचे स्थापत्यविशारद राहुल चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. त्याचा संपुर्ण ढाचा लाकडाचा असल्यामुळे, दुरुस्तीमध्ये खराब झालेला लाकडी भाग बदलण्यात आला. पुर्वीच्या काळी त्याच्या छपरावर मंगलोरी कौलांऐवजी मेटलशिट्स होत्या. आताही छपरासाठी मेटलशिटस वापरण्यात येत आहेत. हे काम सुरु असताना बॅंडस्टॅंडच्या बाजूने खोदल्यावर चारही दिशांऩा पायऱ्या आणि रेलिंग दिसून आले. आता त्याचाही समावेश दुरुस्तीमध्ये करण्यात आला आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल आणि येथे बॅंडस्टॅंडचा जुना व नवा फोटो, माहितीफलक येथे लावण्यात येईल. त्यामुळे आता येत्या काळात पुन्हा येथे संगीताचे कार्यक्रम किंवा काव्यवाचनासारखे कार्यक्रम आयोजित करता येतील.- स्वप्ना जोशी, रिसर्च असिस्टंट, वास्तूविधान
गोविंद माडगावकरांच्या पुस्तकामध्येही वर्णन
बॅंडस्टॅंडचा उल्लेख 1863 साली मुंबईचे वर्णन हे पुस्तक लिहिणाऱ्या गोविंद माडगावकरांनीही केला आहे. मुंबईचे वर्णन या पुस्तकात ते लिहितात, 'ब्यांडस्टांड हे मनास उल्हास करणारे ठिकाण कांपाच्या मैदानात पालो बंदराच्या किंचित पुढे आहे. हे चारही बाजूंनी उघडे असून गायक लोकांचा मात्र समावेश होई इतके मोठे आहे. आणि आत त्यांची वाद्ये ठेवण्यासाठी बांक मांडलेले असतात. व लोकांस बसायासाठी ही सभोवती बांक बसविले आहेत. संध्याकाळच्या पांच घंटा झाल्या म्हणजे एथेंही वाद्यें वाजविणारी मंडळी जमते. हे गव्हर्नराच्या चाकरींत असणारे, व त्याच्या घरी इंग्रजी वाद्यें वाजविणारे, म्हणून ह्यांस गव्हर्नर्स ब्यांड असे म्हणतात. हे गोऱ्या पलटणींतील लोक असून उत्तम प्रकारच्या नव्या सुस्वरांनी हीं वाद्यें आठवड्यांत तीन खेपा या ठिकाणीं लोकांच्या कर्मणुकीकरिंता वाजवीत असतात.'