मुंबई : कोरोना ही नैसर्गिक आपत्ती समजून महाराष्ट्रातील गरीब, दुर्बलांना लॉकडाऊनच्या काळात अर्थसाहाय्य करा, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. तसेच, हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.३० एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्या ११.९ लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. राज्यात आजमितीस ५.६४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा तुटवडा ही चिंतेची बाब आहे. आज राज्यात १२०० मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ही मागणी दिवसाला २ हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गांनी व त्यातही प्रामुख्याने हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. रेमडेसिविरची निर्यात थांबविण्याच्या निर्णयाविषयी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता लगेच मिळावा. लघुउद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्राच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घेतली आहेत. त्यांच्याकडून पहिल्या तिमाहीत हप्ते न स्वीकारण्याच्या सूचना बँकांना द्याव्यात. मार्च, एप्रिलची जीएसटी परतावा मुदत आणखी ३ महिने वाढवून मिळावी.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री