Corona Vaccine : हाफकिनला कोवॅक्सीन उत्पादनास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:15 AM2021-04-16T06:15:40+5:302021-04-16T07:14:27+5:30
Corona Vaccine:
मुंबई : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास एक वर्षांचा कालावधी दिला आहे.
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे, तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.