कोल्हापूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीची टोचणी सुरू असून, यामुळे ३८ जणांना रिॲक्शन आल्याचे सांगण्यात आले; परंतु या सर्वांची प्रकृती आता ठणठणीत असून, कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ११ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण केले जात आहे. हे लसीकरण केवळ शासकीय आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्यांना केले जात आहे; परंतु अजूनही या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे प्रतिसाद मिळालेला नाही. आता लसीकरणासाठी आणखी ९ केंद्रे वाढविण्यात आली आहेत. २३ जानेवारी अखेरपर्यंत ५५०० जणांना ही लस देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यापैकी केवळ ३५०१ जणांनी लस टोचून घेतली आहे. त्यापैकी ३४ जणांना रिॲक्शन झाली आहे. यातील काही जणांना ताप आला, काहींचे डोके दुखायला सुरुवात झाली, तर काहींना मळमळायला लागले; परंतु हा त्रास काही तासांपुरताच असून, आता या सर्वांची तब्येत ठीक असल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीच्या काळातील ११ केंद्रांनंतर आता ग्रामीण भागात ८ आणि कोल्हापुरात १ केंद्र वाढविण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, मलकापूर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली, जयसिंगपूर या नव्या आरोग्य संस्था वाढविण्यात आल्या आहेत. या आठवड्यामध्ये उद्या बुधवार, गुरुवार, शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण करणार आहे.
उद्दिष्टाच्या १३ टक्केच कामकोल्हापूर जिल्ह्यात अजूनही एकूण लसीकरणाच्या उद्दिष्टाच्या केवळ १२ टक्के काम झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील २२४१६, कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागाकडील ११४६१, अशा एकूण ३३ हजार ८७७ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४५९८ जणांना सोमवारअखेर लस टोचण्यात आली आहे. १३.५७ टक्के लसीकरण आतापर्यंत झाले आहे.
लसीकरणाबाबत कुणीही मनामध्ये शंका घेऊ नये. आमच्यासारख्या ५०० हून अधिक वैद्यकीय अधिकऱ्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. अगदी कमी जणांना थोडा त्रास झाला आहे; परंतु तो काही तासांसाठी झाला आहे. आता या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही शंकाकुशंका मनात न घेता लस टोचून घ्यावी. - डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी