मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचं प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४९ रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. गेल्या १२ तासांत राज्यात कोरोनाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोपेंनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या वाढली आहे. ४९ कोरोनाबाधितांपैकी ४० जण परदेशातून आलेले आहेत. त्यांना परदेशात असताना कोरोनाची बाधा झाली. ते इथे आल्यावर त्यांच्या माध्यमातून संसर्ग झालेल्यांची संख्या फक्त १० आहे, असं टोपे यांनी सांगितलं.सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. केंद्रानं दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन सुरू आहे. काही वेळापूर्वीच मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संवाद साधला. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १२ देशांमधील लोकांना आपण प्रवेशबंदी केलीय. मात्र या देशांमधले काही लोक दुसऱ्या देशांमधून भारतात येत आहेत, ही बाब मी हर्षवर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे देशात प्रवेश देताना संबंधितांनी गेल्या महिन्याभरात केलेल्या प्रवासाचा तपशील तपासला जावा, असं मी त्यांना सुचवलं. त्यांनीही याबद्दल सकारात्मकता दर्शवलीय, अशी माहिती टोपेंनी दिली. लोकल, बससेवा बंद करणं शेवटचा पर्याय आहे. ते पाऊल उचलण्याचं सरकारची इच्छा नाही. मात्र लोकांनी गर्दी कमी केली नाही, तर आम्हाला नाईलाजास्तव ते पाऊल उचलावं लागेल, या मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंच्या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. लोकांनी प्रवास टाळावा, अशी कळकळीची विनंती केली. मुंबईतील दोन रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. इतरांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी सांगितलं.
Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:52 PM