coronavirus: फळे-भाजीपाला वापरासंबंधी सफाई मार्गदर्शक तत्त्वे जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:27 AM2020-07-08T04:27:55+5:302020-07-08T04:28:04+5:30
फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते.
नवी दिल्ली : बाजारातून भाजीपाला-फळे आणल्यानंतर लगेच न खाता त्यांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ करून खावी, ही बाब खरं तर कोरोना साथीआधीही लागू होतीच. मात्र, कोरोना महामारीत अन्नसेवन करताना सुरक्षेची काळजी व उपाययोजना करणे दैनंदिन जीवनात अनिवार्य झाले आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड आॅथॉरिटी आॅफ इंडियाने (फास्सी) फळे-भाजीपाला सफाई करताना काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्यांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे.
फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते. त्यांना घरात आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यावर जिवाणू असल्यास फ्रीजमधील इतर खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका असतो. फळे-भाजीपाला भरपूर पाण्यात धुऊन घ्यावा. त्यासाठी पिण्यायोग्य पाणी वापरावे. शक्य झाल्यास क्लोरिनचे अल्प थेंब टाकून त्यांना काही मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावे. फळे-भाजीपाला साफ करताना कधीही साबण, निर्जंतुकीकरणाची रसायने, सफाईसाठीच्या द्रव्यांचा वापर करू नये. फळे-भाजीपाला इतस्तत: न ठेवता, त्यांना योग्य हवेशीर
ठिकाणी साठवणे.
हे नियम पाळा...
बाजारातून आल्यावर आपली पादत्राणे घराबाहेर ठेवणे.
घरात आल्यानंतर कुठल्याही वस्तूंना हात लावू नये.
घरी परतल्यानंतर २० सेकंदांपर्यंत हात व्यवस्थित धुऊन घ्यावेत.
घराबाहेर जाताना वापरलेले कपडे घराबाहेर वेगळ्या बास्केटमध्ये जमा करावेत.
बाहेरचे कपडे घरात वापरू नये
खाद्यपदार्थ पॅकमध्ये असताना त्यांच्यावर साबण किंवा अल्कोहोलयुक्त द्रव फवारून त्याचे निर्जंतुकीकरण करावे. जेथे शक्य आहे, तेथे पाणीही वापरावे.
सिंक अथवा पृष्ठभाग साफ करून घ्यावा.