मुंबई : राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील मोठी देवालये मंगळवारी दुपारनंतर देवदर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी शिर्डीतील साई मंदिर बंद करण्यात आले आहे. औंढा नागनाथ व इतर देवालयेही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली.मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे़ यापूर्वी १९४१ साली कॉलरामुळे ब्रिटिशांनी रामनवमी उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवले होते़ बुधवारी नाश्ता पाकिटे सुरू राहतील़ भक्तनिवासही बुधवार सकाळपर्यंत रिकामी करण्यात येणार आहे़ रामनवमी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थांनी घेतला आहे. याशिवाय जिल्ह्यातील देवगड (ता. नेवासा), मोहटा देवी (ता. पाथर्डी), सिद्धीविनायक (सिद्धटेक, ता. कर्जत)ही मंदिरेही बंद करण्यात आली आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून शनी देवाचे (शनिशिंगणापूर) दर्शन भाविकांसाठी बंद होणार आहे.रेणुकादेवीसह सर्व मंदिर बंदसाडे तीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिर प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला़नागनाथ ज्योतिलिंगचे दर्शन बंदश्री नागनाथाचे दर्शन मंगळवारी रात्रीपासून भाविकांसाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार तथा मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग माचेवाड यांनी दिले असून, नित्यपूजा,कार्यालयीन कामकाज व पूजा, स्वच्छता सुरू राहणार आहेत.जोतिबा यात्रा स्थगितबुधवारपासून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता कोल्हापूरची अंबाबाई व दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. श्री जोतिबाची ७ एप्रिल रोजी होणारी चैत्र यात्राही स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला.श्री एकविरादेवी मंदिरही बंदधुळे जिल्हा प्रशासनाने सर्व गावांचे आठवडे बाजार आणि ग्रामीण भागातील विविध यात्रौत्सवावर बंदी आणली आहे. खान्देशातील श्री एकवीरा देवी मंदिर हे ३१ मार्चपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:07 AM