Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 52वरून 63वर; मुंबईत 10 नव्या रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:07 PM2020-03-21T12:07:25+5:302020-03-21T12:09:19+5:30
मुंबईत 10, तर पुण्यात एक अशा 11 नव्या रुग्णांची नोंद होऊन राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 63वर पोहोचला आहे.
मुंबईः कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ झाली असून, 52वरून रुग्णांची संख्या आता 63वर पोहोचली आहे. मुंबईत 10 जणांना कोरोनाची लागण झाली असून, विदेशातून आलेल्या रुग्णांच्या संसर्गातून तिघांना बाधा झाली आहे. मुंबईत 10, तर पुण्यात एक अशा 11 नव्या रुग्णांची नोंद होऊन राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 63वर पोहोचला आहे. 63पैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे, तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आलेले आहेत. राज्यात सध्या कोरोना तपासणीच्या 7 लॅब कार्यरत असल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनानं 63 जण संक्रमित झाले आहेत. काल संख्या 52 होती आता ती थेट 63 झाली आहे. या नवीन रुग्णांत 10 मुंबईचे आहेत, एक पुण्याचा आहे. परदेशातून आलेले लोक 8 आहेत. तीन हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. काल पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टेस्टिंगची सुविधा वाढवून देण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा मी पवारसाहेबांना सांगितला होता, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
कुठल्याही परिस्थितीत राज्यातील टेस्टिंग लॅब वाढल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातल्या रुग्णालयात आम्ही टेस्टिंग सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आयसीएमआरआयच्या नियमावलीत आम्ही बसत असू, तरच आम्हाला परवानगी द्या, असंसुद्धा आम्ही डॉ. हर्षवर्धन यांना सांगितलं आहे. आम्ही तुमचे सर्व नियम पाळू, फक्त आम्हाला परवानगी द्या आणि किट्स द्या, त्याला मात्र तुम्ही नाही म्हणू नका, असा केंद्राकडे आग्रह धरलेला आहे. पूर्वी फक्त कोरोनाच्या तपासणी करण्यासाठी तीन प्रयोगशाळा होत्या, आता जवळपास त्यांची संख्या सातवर गेलेली आहे. या टेस्टिंग लॅबची संख्या 12 ते 15पर्यंत व्हायला हवी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही https://t.co/YVYfQlRNeS
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2020