मुंबई: कोरोना संकट काळात केंद्राकडून महाराष्ट्राला पुरेशी मदत मिळत नसल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. मोदी सरकारनं राज्याच्या वाट्याचा वस्तू आणि सेवा कर थकवल्याचा मुद्दाही राज्य सरकारनं अनेकदा उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं. 'कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. केंद्राकडून विविध मार्गांनी राज्याला मदत मिळाली. पण केंद्र सरकार मदतच करत नसल्याचा, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो. एकच आरोप वारंवार केल्यानंतर तो खरा वाटू लागतो. मात्र केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्तच मिळालं आहे,' असं फडणवीस म्हणाले.'गरिब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला. गहू, तांदूळ, डाळ केंद्राकडून देण्यात आली. स्थलांतरित मजुरांनादेखील केंद्राकडून अन्नधान्य देण्यात आलं. यावर एकूण ४ हजार ५९२ कोटी रुपयांचा खर्च झाला. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून १ हजार ७२६ कोटी देण्यात आले. जनधन योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात १ हजार ३०८ कोटी जमा झाले असून ६५० कोटी रुपये लवकरच जमा होतील. उज्ज्वला योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर देण्यात आले असून त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. विधवा, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्या खात्यात ११६ कोटी रुपये जमा झाले आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी दिली. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांनाही सरकारनं भरीव मदत केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'आतापर्यंत राज्यातून ६०० श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुटल्या आहेत. प्रत्येक रेल्वे गाडीवर केंद्रानं जवळपास ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे श्रमिक रेल्वे गाड्यांवर ३०० कोटींचा खर्च झाला आहे. मजुरांच्या छावण्या, त्यांचं अन्नधान्य यासाठी केंद्रानंच एसडीआरएफच्या माध्यमातून १ हजार ६११ कोटी रुपये दिले. केंद्राकडून राज्याला १० लाख पीपीई किट्स आणि १६ लाख एन ९५ मास्क देण्यात आले. याशिवाय इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ४४८ कोटी दिले गेले,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
CoronaVirus News: केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 5:01 PM