- विशेष प्रतिनिधी मुंबई : कारखान्यांनी आपल्या कामगारांना एक आठवड्यात ६० तासांपेक्षा अधिक काम देऊ नये, असा आदेश राज्याच्या कामगार विभागाने काढला आहे. त्यात कामगारांसंदर्भात काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढलेल्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, कामगारांच्या ओव्हरटाइमचे वेतन हे साधारण वेतनाच्या दुप्पट दराने दिले पाहिजे.कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल. कोणत्याही दिवशी कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. कामाचे तास हे विश्रांतीच्या वेळेसह १३ तासांपेक्षा अधिक असू नयेत. कोणत्याही आठवड्यात एकूण कामाचे तास साआठ तासांपेक्षा अधिक असू नयेत.कोणत्याही कामगारास सलग सात दिवस ओव्हरटाइम देऊ नये तसेच कोणत्याही तिमाहीत ओव्हरटाइमचे तास हे ११५ तासांपेक्षा जास्त असू नयेत. ही सूट ३० जूनपर्यंत राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कारखान्यांच्या मालकांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली पाहिजे. कारखान्यांमधील उत्पादक प्रक्रियेदरम्यान दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर अनिवार्य करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
coronavirus: आठवड्यात ६० तासांपेक्षा जास्त काम देऊ नका; शासनाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 5:30 AM