coronavirus: विदेशी गुंतवणुकदारांसाठी विशेष कृतीदलाची स्थापना, सुभाष देसाई यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:57 AM2020-05-11T05:57:42+5:302020-05-11T05:58:46+5:30
कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेल्या देशांमध्ये विविध योजना आखल्या जात आहेत. सध्याच्या आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होत आहे.
मुंबई : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणुकीच्या व्यवस्थापन आणि विस्तारासाठी राज्याच्या उद्योग विभागाने एक विशेष कृतीदलाची स्थापना केल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेल्या देशांमध्ये विविध योजना आखल्या जात आहेत. सध्याच्या आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होत आहे. यात भारताकडेही गुंतवणुकीच्या दृष्टीने समर्थ पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी देसाई यांनी या विशेष कृतीदलाची नियुक्ती केली आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन व उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांचा कृतीदलात समावेश आहे.
या कृती दलातील ज्येष्ठ अधिकारी सध्या गुंतवणुकदारांशी वाटाघाटी करीत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, तैवानसह अन्य देशांच्या गुंतवणुकदारांचे प्रतिनिधी सध्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह चर्चा करीत आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे आकर्षणाचे केंद्र राहावे, आलेले प्रस्ताव वेगाने अंमलात यावेत यासाठी तपशीलवार धोरण तयार करण्यात येत आहे. औद्योगिक सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता अन्य प्रोत्साहने वाढवून गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला पहिली पसंती
कोरोनामुळे चीनमधून गुंतवणूक काढण्याबाबत अनेक प्रगत राष्ट्रामंध्ये चर्चा सुरू आहे. चीनमधील गुंतवणूक इतरत्र वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. भारताकडे या गुंतवणुकदारांचा ओढा असून त्यातही गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र कायमच पहिल्या पसंतीचे राज्य राहिले आहे.
च्राज्यातील औद्योगिक वातावरण, उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा तसेच आवश्यक कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अनेक देशांचे गुंतवणूकदार वाटाघाटींसाठी तयार झाले, ही महाराष्ट्रासाठी आश्वासक बाब असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.