मुंबई : कोरोनाने आता जवळपास संपूर्ण देशातच हात-पाय पसरले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात देशातील अत्यावश्यक सुविधा सोडल्या, तर धार्मिक स्थळांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी हिंदूंनीही रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि गुढीपाडवादेखील घरातच साजरा केला. याच पार्श्वभूमीवर, 'हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?', असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
यासंदर्भात राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे, यात "कोरोना संचारबंदीत जर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केलेत तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? ह्या कोरोनाच्या संकटात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये ह्याची काळजी सरकारने घ्यावी' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
मनसेचे अधिकृत ट्विटर अकाउंट 'मनसे अधिकृत' वर राज यांनी, देशात सुरू असलेल्या लॉकडाउनवरूनही चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विट करत, "कोरोना टाळेबंदीमुळे देशात-राज्यात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील. अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्या सर्वांचा विचार सरकार करणार का?", असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.