मुंबई - देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. मात्र रुग्णांच्या संख्येने तब्बल 86 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 86,83,917 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज 4,496 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज 7,809 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 16,05,064 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 84,627 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.44% झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी (12 नोव्हेंबर) कोरोनाचे 4,496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 122 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 17,36,329 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 45 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 16 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 16,05,064 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
अलर्ट! गर्दीच्या ठिकाणी जाताय तर असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
कोरोनाच्या संकटात दिलासादायक माहिती समोर येत आहे. भारताचा रिकव्हरी रेट वाढला असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर लाखो लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सणासुदीच्या काळात जास्त काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोकांनी कोरोना काळात नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सण-समारंभाचे दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दीही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'एम्स' रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्यासोबत गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बाजारपेठा आणि लग्न समारंभातून कोरोना वेगाने पसरत असल्याचं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने मास्क लावला नसेल आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तो एकाच वेळेस अनेक लोकांना कोरोना संक्रमित करू शकतो असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. कोरोना संक्रमित व्यक्ती जिथे जातील तो संपूर्ण भाग आणि त्यांच्या नातेवाईकांना संक्रमणाचा धोका कायम असणार आहे. असे लोक कोरोनाचे 'सुपर स्प्रेडर' म्हणून काम करतात. 'सुपर स्प्रेडर'ची संख्या सध्या दिल्लीत जास्त असू शकते, अशी शक्यताही डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. कारण दिल्लीत लोक घराच्या बाहेर पडून बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. तसेच सण-समारंभातही सहभागी होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याची आणि जितकं शक्य असेल तितकं या गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं असल्याचं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.