Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 08:03 AM2022-04-27T08:03:46+5:302022-04-27T09:13:30+5:30

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे

Coronavirus: Mask compulsory again in Maharashtra ?; Likely to be decided soon | Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता

Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे. 

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली.  मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.  

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती करण्याबाबतची शिफारस टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, तसेच इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वत:वर घरच्या घरीच उपचार करून घेत आहे. त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही, असे निरीक्षणही टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदविले आहे.

टास्क फोर्सच्या सूचना
किमान बंदिस्त ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करावे. विशेषत: चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेता, या ठिकाणी मास्क बंधनकारक पाहिजेत. विमान कंपन्या प्रवाशांना मास्क वापराविषयी वारंवार सांगतात, तशाच पद्धतीने रुग्णालयांमध्येही मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देणे आवश्यक आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी २७० दिवसांचे अंतर कमी करून १८० दिवसांवर आणावे.

भविष्यात विषाणूचे काही परिवर्तित प्रकार येऊ शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वच विषाणूचे प्रकार ओमायक्रॉन इतके सौम्य असतीलच असे नाही. त्यामुळे मास्क घालणे व लसीकरण करणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे, असे टास्क फोर्सने स्पष्ट केले. विषाणूचे परिवर्तित प्रकार जाणून घेण्यासाठी व अधिक चांगली उपाययोजना करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगचे निकाल वेळेवर मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रयोगशाळांची संख्या वाढवावी, असे टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

 

Web Title: Coronavirus: Mask compulsory again in Maharashtra ?; Likely to be decided soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.