CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ४० टक्क्यांनी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 01:35 AM2020-11-02T01:35:46+5:302020-11-02T06:59:19+5:30
CoronaVirus News in Maharashtra : राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत.
मुंबई : राज्याच्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत असून, दैनंदिन मृत्यूंमध्येही घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदा राज्यात दोन अंकी मृत्यूसंख्येची नोंद झाली. हे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे.
राज्यात शनिवारी नोंद झालेले दिवसभरातील काेराेनाचे ७४ मृत्यू हे मागील १५९ दिवसांतील सर्वांत कमी प्रमाण आहे. यापूर्वी, राज्यात २५ मे रोजी दिवसभरात ६० कोरोना रुग्णांचा बळी गेला होता. राज्यात मागील १४ दिवसांत दैनंदिन मृत्यूंची संख्या २०० पेक्षा कमी आहे.
दरम्यान, राज्यात दररोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या जवळपास ७० हजार असूनही पॉझिटिव्हीटी रेटचा आलेख कमी झाला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई, ठाणे, सोलापूर आणि कोल्हापूर येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी, निदान आणि उपचार वेळेवर होत असून संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत आहे.
मुंबईत काेराेनाचे १८ हजार ५२२ रुग्ण सक्रिय
मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ९०८ रुग्ण आढळले असून २५ मृत्यू झाले. त्यामुळे शहर, उपनगरातील काेराेनाबाधितांची संख्या २ लाख ५८ हजार ४०५ झाली असून आतापर्यंत एकूण १० हजार ३१८ मृत्यू झाले. सध्या १८ हजार ५२२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर, उपनगरात रविवारी दिवसभरात १ हजार ७१६ काेराेनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख २९ हजार २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल १७१ दिवसांवर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मागील चोवीस तासांत रुग्णांच्या सहवासातील ९ हजार ६६० अतिजोखमीच्या सहवासितांचा शाेध घेण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे.