मुंबई : कोरोनाची खरी बळीसंख्या अजूनही लपवली जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे हे युद्ध किंवा लढाई कोरोनाविरुद्ध असले पाहिजे, आकडेवारीविरुद्ध नाही. मुंबई महापालिकेतील आकडेवारीबाबत तातडीने लक्ष घालून मुंबईतील स्थितीबाबत स्पष्ट आणि पारदर्शी माहिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा आॅक्सिजनची पातळी कमी झाल्याने मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. कोरोनाच्या काळात आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. आधीच कोरोनाचा कहर वाढत असताना त्यात मानवी चुकांमुळे बळीसंख्येत भर पडणार असेल तर तो प्रकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात १२ जणांना आॅक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले होते. असे प्रकार वारंवार होत राहणे, हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण स्वत: या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.
CoronaVirus News : कोरोना बळींबाबत अजूनही लपवाछपवी- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 3:38 AM