मुंबई : कोरोनावर उपचार करणे आता सोपे होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविडवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना सशर्त मंजुरी दिली आहे. मोलानुपिराविर असे या गोळीचे नाव आहे. हे औषध मुळात जर्मन औषध निर्माता कंपनी मर्क फार्माचे आहे. कोरोनावरील एखाद्या औषधाला मंजुरी देणारा ब्रिटन जगातील पहिलाच देश ठरला आहे. केंद्र सरकारने उपचार पद्धतीमध्ये मोलानुपिराविर या अँटिकायरल औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आपत्कालीन रुग्णांमध्ये वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन मर्यादित वापरासाठी या औषधाला मान्यता दिली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. मोलानुपिराविर औषधाच्या कोरोना रुग्णांसाठी वापराला एफडीएची मान्यता नाही. मागील वर्षात २८ डिसेंबर रोजी केंद्रीय औषध नियामक मंडळाकडून गोळ्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. तरीही कोरोना उपचारामध्ये मोलानुपिराविरचा वापर करू नये, असेच आयसीएमआरने सांगितले होते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या औषधाचा वापर केल्यास त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ रुग्णावर येणार नसल्याचे क्लिनिकल ट्रायल्समध्ये दिसून आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे. काय म्हटले आहे निर्देशात ?सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोना लागण झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अधिक असते. ही शक्यता या औषधामुळे टाळणे शक्य होते. आजाराच्या पहिल्या पाच दिवसांमध्येच त्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असेही निर्देशात म्हटले आहे. अठरा वर्षांखालील तसेच गर्भवतींना हे औषध देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात - राजेश टोपेराज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून, कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला राज्यात कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, सध्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे आणि जास्तीत जास्त जणांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
CoronaVirus News: मोलानुपिराविर कधी घ्यायची? आपत्कालीन वापरास राज्यात परवानगी; देशामध्ये मात्र बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 9:23 AM