मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी कोरोनाच्या नवीन ५५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे.
राज्यात रविवारी सकाळी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये मुंबईत २९ पुण्यात १७, पिंपरी-चिंचवडमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३ आणि औरंगाबादमध्ये दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत चालला आहे. शनिवारी २४ तासांत राज्यात कोरोनाच्या तब्बल १४५ नव्या रुग्णांचे निदान झाले.
राज्यात शनिवारी ७०८ जण विविध रुग्णालयात दाखल आहेत. तर कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०४ नमुन्यांपैकी १३ हजार ७१७ जणांचे प्रयोशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तसेच, आतापर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
याचबरोबर, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात राज्यातून सहभागी झालेल्या १ हजार २२५ पैकी १ हजार ३३ व्यक्तींशी संपर्क आला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
दिल्लीत सहभागींपैकी सात जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामध्ये प्रत्येकी दोन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर व एक जण हिंगोलीतील आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही ३ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.