coronavirus : एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 05:18 AM2020-07-10T05:18:13+5:302020-07-10T05:19:04+5:30
तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत.
सध्या कोरोना संसर्गातून अनेक जण बरे होत आहेत. यांपैकी अनेकांचा गैरसमज आहे, की मला कोरोना होऊन गेला आहे, आता मला काही काळजी घेण्याचे कारण नाही. पण तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत.
तुम्ही कोरोना संसर्गातून बरे झाले तरी तुम्हाला परत कोरोनाचा जो संसर्ग होऊ शकतो, त्यातून तुम्हाला फारसा धोका नाही; कारण काही प्रमाणात तुमच्या शरीरात आधीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. पण असे असले तरी तुम्ही त्या संसर्गाचे वाहक ठरून इतरांना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाला संसर्गित करू शकता.
तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली तरी तुम्हाला परत काहीही लक्षणे येणारच नाहीत असे नाही. तुम्हाला गंभीर स्वरूपाचा जीवघेणा कोरोना परत होणार नसला तरी तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा नक्कीच असू शकतो. म्हणजे आठवडाभर ताप, सर्दी, खोकला, थकवा असे होऊ शकते. जरी जिवाला धोका नसला तरी याने कामाचे तास बुडतील, परत १४ दिवस विलगीकरण असा अनावश्यक त्रास होईल. जर काळजी घेणे सुरु ठेवले तर हा त्रास टळू शकेल.
एकदा कोरोना होऊन गेला तरी तो नेमक्या कुठल्या स्ट्रेनमुळे झाला हे माहीत नसते. सध्या कोविड-१९ च्या एक्स आणि वाय अशा दोन स्ट्रेन देशात आहेत. या राज्यांतर्गत वेगळ्या आहेत की अगदी राज्यातच जिल्ह्यांतर्गत आहेत, की अगदी एकाच तालुक्यातही दोन स्ट्रेनचा संसर्ग सुरु आहे हे अजून नीटसे माहीत नाही. पण देश व राज्य अंतर्गत प्रवास सुरू झाल्याने त्या इकडून तिकडे वाहून गेल्याच असणार. जर आधी एकाचा कोरोना होऊन गेला तर दुसऱ्या स्ट्रेनचा नंतर होऊ शकतो. या नवीन स्ट्रेनचा संसर्ग फ्रेश / नवा असल्याने त्याचा नक्कीच जिवाला धोका असू शकतो. म्हणजे एका स्ट्रेनने झालेला संसर्ग हा त्या स्ट्रेनसाठीच पुढच्या वेळी प्रतिकारशक्ती देईल, दुसºया स्ट्रेनसाठी नाही.
या सर्व कारणांमुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांनी काळजी घेणे सुरू ठेवावे.
- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून,
वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)