योगेश पायघनऔरंगाबाद : कोविड रुग्णांसाठी आवश्यक औषधी, सर्जिकल साहित्याची उपलब्धता वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. मात्र, जिल्ह्यातील एकमेव टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांच्या उपचारात जीवनावश्यक व जीवनरक्षक अशा ७६ प्रकारच्या औषधी, २५ प्रकारच्या सर्जिकल साहित्याच्या तुटवडा आहे.
चालू वर्षाचे अनुदान मिळाले नाही. स्थानिक खरेदीला निधी नाही. त्यामुळे नॉनकोविड रुग्णसेवेत औषधकोंडी निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. घाटी रुग्णालयात औषधी साहित्य बाहेरून लिहून दिले नाही, तर उपचार थांबताहेत, लिहून दिले तर आर्थिक भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. दाखल रुग्णांसाठी घाटीला आवश्यक २११ औषधांपैकी ६० औषधांचा पुरवठा झाला. औषध भांडारात सध्या १३५ प्रकारची औषधी, उपचार सामग्री आहे, तर ७६ प्रकारच्या आवश्यक औषधी संपल्या आहेत.निधीची चणचण : वार्षिक अर्थसंकल्पातून पाच कोटी औषधांना मिळतात. मात्र, वाढलेल्या रुग्णसेवेसाठी बजेट नऊ कोटींवर गेले. चालू आर्थिक वर्षाचा निधी अजून मिळालेला नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन कोटींची मागणी केली होती. परंतु त्यांनीही नकार दिला. स्थानिक खरेदीलाही निधीची चणचण असल्याने औषधकोंडी झाल्याचे औषध भंडाराकडून सांगण्यात आले.