मुंबई: राज्य सरकारनं अनलॉक-५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनंच सुरू ठेवावी लागतील. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्याच्या सूचनादेखील राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. अनलॉक-४ ची मुदत संपत आल्यानं अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना नेमक्या कधी जाहीर करण्यात येणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर ठाकरे सरकारनं अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करू देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरू लागली होती. अखेर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू होतील.पुणे विभागातील ट्रेन सुरू करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू करण्यात येणार आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारवर्ग लोकलनं प्रवास करू शकतो आहे. मात्र तरीही लोकलमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. लोकलमधून प्रवास करू देण्याची विनंती डबेवाल्यांनी केली होती. ती सरकारनं मान्य केली आहे. त्यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड देण्यात येईल.मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये (एमएमएमआर) केवळ अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादन करण्यास परवानगी होती. मात्र अनलॉक-५ मध्ये हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं कारखाने आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय आधी सरकारनं घेतला होता.मुंबईतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळून चित्रपटगृहं सुरू करण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे उद्या याबद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो.
CoronaVirus News: हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू; अनलॉक-५ ची नियमावली जाहीर
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 7:47 PM