मुंबई : राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार होलिकोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये तपासणीसाठी रांगा लागल्या आहेत. तर एका संक्रमित रुग्णाच्या बाजुला बसून विमान प्रवास करणाऱ्या नागपूरच्या प्रवाशाला आरोग्य यंत्रणेने देखरेखीखाली ठेवले आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. सण साजरा करा पण मोठ्या प्रमाणावर नको, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
तसेच केवळ 10 ते 15 दिवस आपल्या सर्वांना काळजी घ्यायची असून मास्क लावण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्य़ांनी कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. तसेच वृत्त देताना खबरदारी घ्यावी असे आवाहनही माध्यमांना केले. सॅनिटायझरने हात धुण्याची गरज नाही. नळाच्या वाहत्या पाण्यामध्येही हात धुतले तरीही चालणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई आणि पनवेलमध्ये असे दोन रुग्ण संशयित आढळले होते. त्यांना तपासणीनंतर सोडून देण्यात आल्याचेही आरोग्य अधिकारी म्हणाले. यानंतर नागपूरच्या प्रवाशाला कोरोनाची लागण झालेली नसून त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.